मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करण्यात यावा, अशी मागणी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी केली. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी केली. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही माध्यमांसमोर बोलताना उपरोक्त मागणी केली. उपरोक्त मागणीवरून ठाकरे पक्षाच्या आमदारांनी विधानसभेतून सभात्याग केला. यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही आमदार कामकाज संपेपर्यंत विधानसभेत परतला नाही. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘सीमाभागाचा प्रश्न सोडवण्याविषयी दोन्ही राज्यांतील नेत्यांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वी घेतली आहे. हा प्रश्न सोडवण्याविषयी अमित शहा यांसमवेत पुन्हा बैठक निश्चित करात येईल.’’