नागपूर : धार्मिक क्षेत्रात राजकारणाचा हस्तक्षेप असणे योग्य नाही. धार्मिक क्षेत्र आणि राजकारण हे वेगवेगळे आहे. राज्यातील सिद्धिविनायक मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, शिर्डीतील साईबाबा मंदिर आदी मंदिरांवर गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी नियंत्रण आहे. त्यामुळे त्यात सरकारी हस्तक्षेप, भ्रष्टाचार आदी गोष्टी समोर आल्या आहेत. म्हणूनच या संदर्भात वेळोवेळी हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिरे, धार्मिक स्थळे सरकारी अधिपत्याखाली नको, अशी वारंवार मागणी होत आहे. सरकारने धार्मिक स्थळे कह्यात घेणे, ती नियंत्रित करणे, चुकीचे आहे. मंदिरांवर सरकारी नियंत्रण असू नये, असे मत भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. नागपूर येथे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी पत्रकारांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक बोलतांना मंगलप्रभात लोढा यांनी वरील मत व्यक्त केले.