मुंबई : रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात एक जागा रिक्त झाली आहे. अश्विन गेल्यानंतर कोण येणार याचीच चर्चा होती. दरम्यान, अश्विनच्या बदलीची घोषणा झाल्याची बातमी समोर आली आहे. अश्विनच्या जागी आलेल्या खेळाडूचे नाव तनुष कोटियन असून तो मुंबईचा आहे. सध्या तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत असून त्याचे वय 26 वर्षे आहे. तनुष हा मुंबईच्या संघाकडून खेळणारा युवा अष्टपैलू खेळाडू आहे. मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी तो ऑस्ट्रेलियात पोहोचण्याची शक्यता आहे.गेल्या काही वर्षांपासून तनुष हा प्रकाशझोतात आला आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये तर तमुषने चांगली कामगिरी केली आहेच, पण यापूर्वी भारताचा ‘ अ ‘ संघ जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा तनुषचा भारताच्या संघात समावेश होता. तनुषने या दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. तनुषच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती. तनुष हा चांगला फिरकी गोलंदाज आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तनुष हा उत्तम फलंदाजीही करतो. आतापर्यंत तनुषने संघासाठी उपयुक्त फलंदाजीही केली आहे. त्यामुळे अश्विनच्या जागी तनुष हा खेळाडू असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु झाली आहे. संघात एका तरुणाचा समावेश करण्यात आला असून तो मुंबईचा असल्याचे सांगितले जात आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 मधील शेवटच्या 2 कसोटी सामन्यांसाठी रविचंद्रन अश्विनच्या जागी अष्टपैलू खेळाडू तनुष कोटियनला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
तनुष कोटियनने इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने २४ धावा केल्या. कोटियनला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. तनुष कोटियन मात्र आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात विकला गेला नाही. तनुष कोटियनचा जन्म मुंबईत झाला आणि तो मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. तो रविचंद्रन अश्विनसारखा एक अष्टपैलू गोलंदाज आहे. मुंबईच्या तनुष कोटियनची प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्द आतापर्यंत जबरदस्त राहिली आहे. त्याने 33 सामन्यात 101 विकेट घेतल्या आहेत. कोटियनने आतापर्यंत फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. त्याने 2 शतके आणि 13 अर्धशतकांसह 1525 धावा केल्या आहेत. तनुषने 20 लिस्ट ए मॅचेसमध्ये 20 विकेट आणि 90 धावा केल्या आहेत. 33 टी-20 मध्ये 6.39 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करताना त्याने 33 विकेट घेतल्या आणि 87 धावा केल्या.