महाराष्ट्रातील घुसखोरांवर कायदेशीर कारवाई करा- गृहमंत्रालय

0

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बेकायदेशीर घुसखोरांवर कडक कारवाई करा असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि इतर संबंधित संस्थांना बांगलादेश आणि म्यानमारमधून महाराष्ट्रात येणाऱ्या घुसखोरांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात शिवसेना (शिंदे गट) उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी अमित शाह यांच्याकडे बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

या मागणीच्या आधारे गृह मंत्रालयाने सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जारी केले आहेत. राहुल शेवाळे यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहीले होते. यात टाटा सोशल सायन्स इन्स्टिट्यूटच्या अहवालाचा हवाला देत महाराष्ट्र आणि मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. टाटा इन्स्टिट्यूटने त्यांच्या अहवालात म्हटले होते की, बांगलादेशी घुसखोर मुंबई आणि राज्याच्या इतर भागात बेकायदेशीरपणे वास्तव्याला आहेत. हे घुसखोर गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील होऊ शकतात, ज्यामुळे मुंबईच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. काही ठिकाणी त्यांना बनावट मतदार ओळखपत्र देऊन मतदार बनवले जात आहे, जे लोकशाहीला धोका निर्माण करू शकते, असेही या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, या धोक्याची झलक सैफ अली खानवरील हल्ल्याच्या माध्यमातून दिसून आली. अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला केल्याच्या आरोपाखाली एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले की, त्या व्यक्तीला आपण एका बॉलिवूड स्टारच्या घरात घुसलो आहोत याची माहिती नव्हती. त्याचा हेतू चोरी करण्याचा होता. हल्लेखोराला ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट येथून अटक करण्यात आली. भारतात प्रवेश केल्यानंतर, त्या व्यक्तीने त्याचे नाव शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर वरून विजय दास असे बदलले. आरोपी, मूळचा बांगलादेशातील झलोकाटीचा रहिवासी असूमन गेल्या ८ महिन्यांपासून मुंबईत राहत होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech