मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत स्वतः याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. असे असले तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण होणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर आठवडा होत आला तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण, यावरून खलबतं सुरू आहेत. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी लांबत आहे. मात्र आता बहुप्रतिक्षित शपथविधीचा कार्यक्रम ठरला आहे.