सोलापूर – सोलापूर हा इतिहास निर्माण करणारा जिल्हा आहे. संस्थात्मक उभारणी कशी करायची, हे शंकरराव मोहिते-पाटील यांनी शिकवले. सुशीलकुमार शिंदेंनी सत्ता कधी डोक्यात जाऊ दिली नाही. सामान्य माणसाचा विचार सोडला नाही. हे त्यांच्या कर्तृत्वाचे यश आहे. भविष्यात वयाचा विचार न करता नव्या पिढीसाठी प्रेरणादायी काम करा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावेळी दिला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ८४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून अकलूज येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ. रणजीतसिंह मोहिते-पाटील, खा. धैर्यशील मोहिते- पाटील, खा. ओमराजे निंबाळकर, बजरंग सोनवणे, निलेश लंके, आ. प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.