मुंबई – भाजपा नेत्या आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्या. जे. के महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निर्णय दिला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी हा निर्णय आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला आणि नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचं म्हटलं आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. अशात नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र २०२१ मध्ये अवैध ठरवले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच, बनावट जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद २८ फेब्रुवारीला पूर्ण झाला.