पुणे : ‘बारामती म्हणजे, पवार आणि पवार म्हणजेच, बारामती’हे गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रुजलेले समीकरण. काकांचीसाथ सोडून अजित पवारांनी भाजपची साथ दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण लढणार? असा प्रश्न निर्माण झाला. आणि चर्चा सुरू झाली खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांचीच वहिनी आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार असल्याची. बारामतीसाठी महायुतीच्या उमेदवाराचं नाव जरी जाहीर झालं नसलं, तरी राष्ट्रवादीनं लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर बारामतीतील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेच्या रिंगणात आमने-सामने उभ्या ठाकणार असल्याच्या चर्चा रंगल्यानंतर पहिल्यांदाच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांची वहिनी सुनेत्रा पवार एकत्र येणार आहेत.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार आगामी लोकसभा एकमेकांच्या विरोधात लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. राजकीय वर्तुळात नणंद-भावजयमध्ये रंगणाऱ्या या निवडणुकीच्या चुरशीची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच आता पुन्हा राजकीय वर्तुळात या नणंद-भावजयची चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे, लवकरच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एका मंचावर एकत्र दिसणार आहेत. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीज यानिमित्ताने एकत्र येण्याची शक्यता आहे.