डोंबिवली – लोकमान्य गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणासोबत प्रत्यक्ष ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी विविध ठिकाणी क्षेत्रभेटी आयोजित केल्या जातात. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपण सर्व शहरी संस्कृतीत वाढत असल्यामुळे शेतीपासून दूर जात आहोत. विद्यार्थ्यांना शेती म्हणजे काय? शेतात शेतकऱ्यांना किती काम करावे लागते? शेतकरी किती मेहनत घेतात? ऊन, वारा, पाऊस यामध्ये सुद्धा शेतकरी कसे कष्ट करतात? याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना यावा म्हणून त्यांना भाताच्या शेतीमध्ये भाताची लागवड करण्यासाठी नेले जाते.
याही वर्षी विद्यार्थ्यांना दावडी येथे भातशेती दाखवण्यासाठी व भात लागवड करण्यासाठी नेण्यात आले होते. भात शेतीत चिखल किती असावा लागतो? भातशेतीला पाणी किती लागते? चिखलाने हात पाय कपडे माखताता याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी भाताची लागवड करून घेतला.
आवणीतून किंवा वाफ्यातून भाताची रोपे काढून दुसरीकडे लावण्याचा अनुभव या क्षेत्रभेटीत विद्यार्थांना देण्यात आला. या भात शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्या शेतामध्ये विद्यार्थिनींनी नांगरही धरला होता.