रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू सेंट्रल ही दैनंदिन रेल्वे गाडी येत्या १७ फेब्रुवारीपासून अत्याधुनिक एलएचबी रेकसह धावणार आहे. देशभरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या जुन्या गाड्या बदलून त्याऐवजी एलएचबी श्रेणीतील डबे वापरून गाड्या चालवण्याच्या रेल्वेच्या धोरणानुसार हा बदल होणार आहे.
मंगळुरू सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस (गाडी क्र. 12620) या फेरीसाठी १७ फेब्रुवारी, तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू सेंट्रल (12619) या फेरीसाठी १८ फेब्रुवारीपासून हा बदल केला जाणार आहे. नव्या रचनेनुसार ही गाडी पूर्वीच्या २३ ऐवजी २२ डब्यांची धावणार आहे. डब्यांची रचना अशी असेल – टू टायर वातानुकूलित – २ डबे, थ्री टायर वातानुकूलित – ४ डबे, इकॉनॉमिक थ्री टायर एसी – २ डबे, स्लीपर श्रेणी ८ डबे, सर्वसाधारण श्रेणी – ४ डबे, जनरेटर कार – १, एस एल आर -१ डबा.
मत्स्यगंधा एक्स्प्रेस ही कोकण रेल्वे मार्गे धावणारी जुन्या गाड्यांपैकी एक आहे. या गाडीचे पूर्वीचे डबे जुने झाल्याने गाडीसाठी नवीन रेक उपलब्ध करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. रेल्वेचे धोरण आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेता आता ही गाडी नवीन एलएचबी कोचसह धावणार आहे.