उच्चांकी बहुमत घेऊन सत्ता स्थापन करणाऱ्या सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचा लगेचच विसर -श्रीरंग बरगे यांचा आरोप
मुंबई : दरमहा कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाने दिलेल्या सवलत मूल्य प्रतिपुर्ती रकमेवर अवलंबून राहणाऱ्या एसटी महामंडळाच्या प्रशासनाला दहा तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार करता येत नाही, हे अत्यंत दुदैवी महिनाभर राबराब राबून आपल्या कुटुंबाचं पोट भरणाऱ्या सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांना किमान सात तारीख पर्यंत वेतन मिळणे आवश्यक आहे. पण नेहमी दहा तारखेला किंवा त्या नंतर मिळत असेल तर हे कितपत योग्य आहे? दरवेळी कर्मचाऱ्यांनी अरडा ओरड करायची आणि मगच पगार करायचा हे मागील कित्येक महिने सुरू असून मोठी आश्वासने देऊन उच्चांकी बहुमत घेऊन सत्ता स्थापन करणाऱ्या सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचा लगेचच विसर पडला आहे का? असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटीला दरमहा ८५०ते ९०० कोटी रुपये महसूल मिळतो .परंतु यंदा दिवाळीमुळे एसटीला १००० कोटी रुपये इतका चांगला महसूल मिळालेला आहे. तरी देखील वेळेत वेतन होऊ शकत नाही हे कष्टकरी कर्मचाऱ्यांचे दुर्दैव आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ७०० कोटी रुपये इतकी सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम एसटीला सरकार कडून मिळावी असा प्रस्ताव एसटीने पाठवला असून त्या कडे सरकार ढुंकूनही पाहायला तयार नाही. सरकारने विविध प्रकारच्या योजना समाजातील विविध घटकांना दिल्या असून जो कर्मचारी सण, वार, उन वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिन प्रवाशांची वाहतूक करीत आहे. त्याचा मात्र सरकारला विसर पडला आहे.हे दुर्दैवी असून एसटी कर्मचाऱ्यांप्रती सरकारचा रवैया नेहमी दुटप्पी राहिला असून राज्य सरकार कडून सावत्र भावाची वागणूक मिळत असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.