ठाणे : मंगेश तरोळे – पाटील
कर्जत : जैवविविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा असून अन्न, वस्त्र, निवारा, औषधी या जीवनाच्या चार प्रमुख साधनांचा स्त्रोतही माती असल्याने मातीचे संगोपन आणि संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ रवींद्र मर्दाने यांनी येथे केले.येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात आयोजित १० व्या जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रभारी सहयोगी संशोधन संचालक डॉ. पुष्पा पाटील होत्या.
डॉ. मर्दाने यांनी थायलँडचे राजे भूमीबोल अदुल्यादेज यांचा ५ डिसेंबर हा जन्मदिन ‘ जागतिक मृदा दिन ‘ म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्र महासभेने २०१३ च्या ६८ व्या अधिवेशनात घोषित केल्याने सन २०१४ मध्ये पहिल्यांदा साजरा झाल्याचे सांगितले.७० वर्षे १२६ दिवसांची सम्राटाची कारकीर्द गाजवलेल्या भूमीबोल यांच्या कार्याचे व या दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे त्यांनी नेटके विवेचन केले.’ मातीची काळजी : मापन निरीक्षण व व्यवस्थापन ‘ हे यावर्षीच्या उत्सवाचे घोषवाक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.ते म्हणाले की, भारताच्या ३२८.७३ दशलक्ष हेक्टर जमिनीच्या क्षेत्रफळापैकी १२०.४० दशलक्ष हेक्टर जमीन नापीक होत आहे.पाणी व वाऱ्यामुळे दरवर्षी देशातील ५.३ अब्ज टन सुपीक मातीची धूप होऊन ती नष्ट होत चालली आहे.
महाराष्ट्राच्या ३.०७ दशलक्ष हेक्टर भौगोलिक क्षेत्रफळापैकी ४२.५० टक्के जमीन खराब आहे.१५९ लाख हेक्टर जमीन दुष्काळाच्या छायेत आहे.१४६ लाख हेक्टर क्षेत्रफळावर माती आणि पाणी संवर्धनाची नितांत गरज आहे.पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी राब भाजणी ऐवजी पर्यायी गादी वाफे पध्दतीचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांना उद्युक्त करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.पुष्पा पाटील व उपस्थितांनी भूमीबोल अदुल्यादेज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.जीव रसायन शास्त्रज्ञ डॉ. तुषार बेडसे यांनी आभार मानले.यावेळी डॉ.महेंद्र गवई, डॉ. मीनाक्षी केळुसकर, डॉ. वैशाली सावंत, डॉ.राजू सावळे,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.