रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या श्रुती फणसे (एमए, अर्थशास्त्र) या विद्यार्थिनीची पश्चिम विभागीय अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठ महिला बॅडमिंटन संघात निवड झाली आहे. येत्या ९ ते १३ नोहेंबरदरम्यान जगदीश प्रसाद झाबरमल तीब्रेवाला विद्यापीठ (चौदेला, झुनझुनू, राजस्थान) येथे ही पश्चिम विभागीय स्पर्धा होणार आहे. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई विद्यापीठ महिला बॅडमिंटन संघाची निवड चाचणी मुंबई विद्यापीठ क्रीडा विभाग मरिन लाइन्स येथे घेण्यात आली होती. त्यात श्रुतीची निवड झाली. तिला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, वडील माधव फणसे आणि आई अंजली फणसे यांचे मार्गदर्शन लाभले.