राज ठाकरे यांचे केंद्र सरकारला साकडे
अनंत नलावडे
मुंबई : लातूर जिह्यातील अहमदपूर तालुक्याच्या तळेगाव गावातील एकूण शेतजमीनी पैकी जवळपास ७५ टक्के शेत जमिनीवर ताबा सांगण्याच्या वक्फ मंडळाच्या कृतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सडकून टीका केली. वक्फ मंडळाच्या मनमानी कारभाराला चाप बसविण्यासाठी केंद्र सरकारने विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता शक्यतो संसदेच्या चालू अधिवेशनातच वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करून घ्यावे, असे थेट आवाहन राज ठाकरे केंद्र सरकारला केले. याशिवाय तळेगावमधील शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही तसेच त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे पहावे,अशी अपेक्षाही त्यांनी राज्य सरकारकडून केली.
तळेगावमधील शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ मंडळाने आपला ताबा सांगितल्याने खळबळ उडाल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज ‘एक्स’ या समाज माध्यमात पोस्ट करून वक्फच्या दाव्याचा सडकून समाचार घेतला. हा प्रश्न या जमिनीपुरता नाही. कारण वक्फ मंडळ गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय त्याला चाप कसा बसवणार हा आहे ?काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारे विधेयक केंद्र सरकारने सादर केले. त्यावर मुस्लिमधार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला.त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवले गेले. या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाचीच होती, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.
वक्फ मंडळाच्या सुधारणांमध्ये विरोध करण्यासारखे काहीही नाही.नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात ३७० कलम हटवणे, तिहेरी तलाकवर बंदी आणणे,राम मंदिर उभारणी अशी पावले उचलली होती. ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान होता आणि त्यातूनच आम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना पाठींबा दिला होता,याचा पुनरुच्चारही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला.
यानिमित्ताने देशातील एकूणच वक्फ मंडळांना एका गोष्टीची जाणीव मला आज करून द्यायची आहे ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी ‘भूदान चळवळ’ सुरु केली आणि जिच्यात लाखो एकर जमीन देशातील हिंदूंनी सरकारला परत केली होती.जेणेकरून भूमिहीनांना कसण्यासाठी जमीन मिळेल.हा जसा भूमिहीनांसाठी केलेला त्याग होता तसाच तो देशासाठी केलेला त्याग पण होता.असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा खरंतर आता वक्फ मंडळाने पण दाखवावा.सतत कुठे ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगण्यापेक्षा वक्फ मंडळाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवून द्यावे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.