* भाजपानं दाखवले काळे झेंडे
कोल्हापूर – भारतात सध्या दोन विचारधारांची लढाई सुरू आहे, एक विचारधारा जी संविधानाचे रक्षण करते. समानता आणि एकतेचा मुद्दा उपस्थित करते, जी छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा आहे आणि दुसरी विचारधारा संविधान संपवण्याच्या प्रयत्नात आहे. जर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांसारखे लोक नसते तर संविधान अस्तित्वात नसते, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवरायांच्या बहूशस्त्रधारी पुतळ्याचे अनावरण आज, शनिवारी राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून हा पुतळा बसवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यानं पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केली.
राहुल गांधी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. तेव्हा त्यांच्या आरक्षण विरोधी वक्तव्याप्रकरणी भाजपा नेत्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. राहुल यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन भाजपा नेत्यांना अटकाव केला. मात्र भाजपा नेते आक्रमक झाले होते. राहुल गांधी म्हणाले, विचारधारा अंमलात आणणार नसाल तर पुतळा उभारण्याला अर्थ नाही. शिवरायांचे विचार पाळले नाहीत म्हणून सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली. शिवाजी महाराज ज्या विचारसरणीच्या विरोधात लढले त्याच विचारसरणी विरोधात आज काँग्रेस पक्ष लढत आहे. भाजपने शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला आणि काही दिवसांनी पुतळा कोसळला, कारण त्यांचा हेतू चुकीचा होता. शिवाजी महाराजांचा पुतळा बनवायचा असेल तर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचे रक्षण करावे लागेल, असा संदेश भाजपला त्यातून दिला आहे. भाजपची विचारधाराच चुकीची आहे. त्यांनी आदिवासी राष्ट्रपतींना राम मंदिर आणि संसदेच्या उद्घाटनाला येऊ दिले नाही. हा राजकीय लढा नसून विचारधारेचा लढा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
सकाळी उठतात आणि योजना आखतात की शिवाजी महाराज यांच्या विचारांचे जे संविधान आहे ते कसे संपवता येईल. हिंदुस्थानच्या संस्थांवर हल्ले करतात, लोकांना भीती घालतात आणि नंतर जाऊन शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर डोकं टेकवतात. हे काही कामाचे नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.