एसटी महामंडळाला २५ हजार नव्या बसेस…..!

0

अर्थमंत्र्यांची तत्वतः मान्यता
मुंबई : अनंत नलावडे
एसटी महामंडळाला आगामी पाच वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यासाठी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी तत्वतः मान्यता दिली आहे.त्यामुळे आता “गाव तेथे नवी एसटी” ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी हे मोठेच पाऊल उचलण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पाच्या आढावा बैठकीत परिवहन खात्याने एसटी महामंडळाच्या सद्यस्थितीवर चर्चा केली.महामंडळाकडे सध्या १४ हजार ३०० बसेस असून, त्यापैकी १० हजार बसेस १० वर्षांहून जुन्या असून त्या प्रवासी सेवेतून लवकरच बाद होण्याच्या मार्गावर आहेत.या पार्श्वभूमीवर, दरवर्षी ५,००० नवीन बसेस घेऊन पाच वर्षांत २५,००० बसेसचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाला तातडीने मान्यता देत, परिवहन विभागाला लवकरच कार्यवाहीसाठी सूचना दिल्या. तसेच २०२९ पर्यंत २५,००० लालपरी आणि ५,००० इलेक्ट्रिक बसेस घेऊन एसटीचा ३०,००० बसेसचा स्वतः चा ताफा उभा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. “आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ही घोषणा तमाम एसटीप्रेमी जनतेसाठी गोड भेटच असून भविष्यात गावागावांपर्यंत एसटी सेवा पोहोचवण्याचे स्वप्न पूर्ण होईल,” असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech