९८ व्या अ.भा.म.सा. संमेलनाचे शरद पवार यंदा प्रथमच स्वागताध्यक्ष

0

मुंबई : सुमारे सात दशकांनी राजधानी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याची संधी यापूर्वी चार वेळा लाभलेले शरद पवार यंदा प्रथमच स्वागताध्यक्ष झाले आहेत. शरद पवार हे केवळ उत्तम वाचक अथवा साहित्यप्रेमी नसून महाराष्ट्रातून सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीशी प्रारंभापासून जोडले गेले आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, चिपळूण आणि सासवड येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे. तर, १९९० मध्ये त्यांनी स्वागताध्यक्ष व्हावे असे पुण्यातील संमेलनात समितीने ठरविले होते मात्र, त्यावर्षी ते होऊ शकले नाही. यंदा दिल्लीमध्ये महाराष्ट्राची अस्मिता ज्या व्यक्तींभोवती केंद्रीत असते त्यातून सर्वात ज्येष्ठ नाव शरद पवार यांचे आहे. त्यांच्या अनुभवांमुळे हे संमेलन अविस्मरणीय होईल आणि राजकारणाच्या पलिकडे जाऊन मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागर करणारे ठरेल, असा विश्वास नहार यांनी व्यक्त केला.

सरहद संस्थेच्या वतीने २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दिल्ली येथील तालकटोरा मैदानावर हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये होणारे संमेलन यशस्वी करण्याच्या उद्देशातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना यापूर्वी झालेल्या कार्यक्रमांसाठी निमंत्रित करण्यात आले होते. या पुढील कार्यक्रम आणि व्यवस्थांंमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे सहकार्य घेण्यात येणार असल्याची माहिती सरहद संस्थेचे संजय नहार यांनी सोमवारी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, संयोजन समितीचे डॉ. सतीश देसाई आणि सरहद संस्थेचे शैलेश पगारिया या वेळी उपस्थित होते.

यापूर्वी १९५४ साली दिल्लीला ३७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, तर उद्घाटक तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नाही. राजधानी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाला साहित्यिक, राजकीय, सामाजिक अभ्यास असणारे व्यक्तिमत्व लाभावे, म्हणून सरहद संस्थेने शरद पवारांना विनंती केली होती. या विनंतीला मान देत त्यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारल्याचे समोर येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech