पुणे- लोकसभा निवडणूक निकालात भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने मुसंडी मारत विक्रमी यश प्राप्त केले आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपाची एनडीए २९३ जागांवर पुढे आहे तर २३३ जागांवर इंडी आघाडी पुढे आहे. शरद पवारांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना फोन केला आहे, अशी माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्राबाबू नायडूंना फोन केल्याचे समोर येत आहे. त्यावेळी ते काय बोलतील याकडे लक्ष लागले आहे.नितिश कुमारांना फोन करून शरद पवारांनी उपपंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली आहे, अशी माहितीही सुत्रांकडून मिळत आहे. शरद पवारांवर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
नितीशकुमार, चंद्राबाबू नायडूंचा कधी या गोटात तर कधी त्या गोटात जाण्याचा इतिहास आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबुंची स्वबळावर सत्ता येत आहे. यामुळे नायडू आणि कुमार निकालानंतर बाजू पलटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.भाजपाला राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये चांगलाच फटका बसला आहे. यामुळे गेल्यावेळी एकट्याने बहुमताचा आकडा पार करणाऱ्या भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आता मित्रपक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे. २०१९ मध्ये शिवसेना, अकाली दलासारखे मोठे मित्रपक्ष भाजपाची साथ सोडून निघून गेले होते. तरीही बहुमत असल्याने त्याचा परिणाम भाजपावर झाला नव्हता. परंतु आता बहुमताचा आकडा स्वत:च्या जिवावर गाठणे कठीण असून सत्ताकेंद्रही आता बदलण्याची शक्यता आहे.