हैदराबाद : छत्तीसगड-तेलंगणा सीमा भागात सुरक्षा दलाच्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत एका महिला नक्षलवाद्यांसह 7 जणांचा खात्मा केला आहे. एतुरुनगरम जंगल परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या संदर्भात एसपी मुलुगु डॉ शबरिश यांनी माहिती दिली आहे. घटनास्थळावरून दोन एके-47 आणि एक इन्सास रायफल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटल्याचेही सांगितले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या आठवड्यात छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी सुरक्षा यंत्रणांची ही मोठी कारवाई आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान, या चकमकीत ठार झालेल्या काही नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे.
यामध्ये कुरसम मंगू, एगोलाप्पू मल्लैया, मुसाकी देवल, मुसाकी जमुना, जय सिंह, किशोर आणि कामेश यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अनेक आधुनिक शस्त्रे जप्त केली आहेत. चालपाका जंगल परिसरात ही चकमक झाली. या चकमकीत मारल्या गेलेल्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या काही प्रमुख नेत्यांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. सुरक्षा दल इथुरुनाग्राममधील चालपाकाजवळील जंगल परिसरात शोध मोहीम राबवत होते. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करत गोळीबार सुरू केला. पोलिसांचे पथक नक्षलवाद्यांचा शोध घेत आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
नुकतेच 22 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. यानंतर आज 7 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे प्रकरण तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील इटुनगरम पोलिस स्टेशन परिसरातील आहे. चकमकीनंतर सुरक्षा दलांनी सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. नक्षलवादी काही मोठे गुन्हे घडवून आणण्याच्या योजना आखत होते, परंतु जवानांनी त्यांना चकमकीत ठार केले.