सोलापूर – विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करता येणार आहे, पण त्यासाठी त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एक अर्ज द्यावा लागतो. तो अर्ज देण्याची मुदत २२ ते २६ ऑक्टोबरपर्यंत आहे. घरबसल्या मतदान करण्याचा पर्याय निवडलेल्या ज्येष्ठांना १० नोव्हेंबरपासून मतदान करता येणार आहे. त्यासाठी चौघांचे पथक त्यांच्या घरी जाईल. सोलापूर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील ५२ हजार ७९६ मतदार आहेत.२०१९च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, करमाळा, बार्शी या चार मतदारसंघातील आमदार अवघ्या पाच हजारापेक्षा कमी मताने विजयी झाले होते.
त्या निवडणुकीतील बहुतेक विजयी उमेदवारांचे मताधिक्य पाहता यंदाच्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातील लढती काठावरील आहेत, त्या उमेदवारांसाठी ८५ वर्षांवरील ज्येष्ठांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, पंढरपूर या पाच मतदारसंघातील ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या पाच ते सहा हजारांपर्यंत आहे. त्यामुळे या मतदारांची यादी घेऊन उमेदवार त्यांच्यापर्यंत पोचण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या, बंडखोरी पाहता ज्येष्ठांच्या मताला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.