ठाणे: ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर, शिवसेना नेते तसेच स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत सतीश प्रधान यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ही मनाला चटका लावणारी बातमी आहे. ठाणे शहर हे ज्यावेळी गावाच्या स्वरूपात होते त्यावेळी सतीश प्रधान या शहराचे प्रथम नगराध्यक्ष झाले आणि त्या ठाणे या गावाचे शहरात रूपांतर होताना पायाभूत सेवा सुविधा आणि कलात्मक शहराचा विकास जडणघडण यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले, त्यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य हे उल्लेखनीय आहे त्या काळामध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हता म्हणून ज्ञानसाधना महाविद्यालय नावाचे एक स्वतंत्र महाविद्यालय सुरू केले आणि कष्टकरी कामगार दलित पीडित उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांना हक्काचे महाविद्यालय सुरू करून दिले. आज या महाविद्यालयाचा वटवृक्ष झाला आहे, हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठात अत्यंत नावाजलेले महाविद्यालय म्हणून नावारूपाला आले आहे, मी सुद्धा याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि माझी संपूर्ण जडणघडण याच महाविद्यालयात झाली.
सतीश प्रधान यांचे योगदान ठाणे शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीमध्ये मोठे आहे. ठाणे शहरांमध्ये निर्माण झालेले दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि अत्यंत महत्त्वाचे असणारे राम गणेश गडकरी रंगायतन हे सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झाले त्यामुळे आज महाराष्ट्राच्या नकाशावर ठाणे शहर जे नावारूपाला आले त्यामध्ये सतीश प्रधान यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.