संतोष देशमुखाच्या मारेकऱ्यांना सुत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे – बाळासाहेब थोरात
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या हत्याकांडातील आरोपी आणि सुत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात केली आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा धाक असावा लागतो मात्र सध्या प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नाही. बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना आहेत. पण पोलीस साधा एफआरआय ही घेत नाहीत इतकी दुर्दैवी स्थिती आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव उभा राहील असेही ते म्हणाले.
काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री आ. अमित देशमुख होते. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना अत्यंत वेदनादायी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आहे. संतोष देशमुख यांच्या मारेक-यांना आणि सुत्रधारांना त्वरित शोधून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. बीड जिल्ह्यासह राज्यात दहशत वाढवण्यासाठी कारणीभूत कोण आहे आणि यामागील खरा मास्टरमाईंड कोण आहे या गोष्टींची सुद्धा सखोल चौकशी होऊन कारवाई केली पाहिजे. गुन्हेगारांना जात धर्म काही नसते या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी व फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे. यावेळी बोलताना माजी मंत्री आ. अमित देशमुख म्हणाले की, परभणी आणि बीड येथील घटना या पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणा-या आहेत. या दोन्ही घटनांमागील गुन्हेगारांना तातडीने अटक करावी व पिडीत कुटुंबांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे.