मॉस्को- गेल्या तीन वर्षांपासून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. मात्र या युद्धामुळे घटलेली लोकसंख्या आणि जन्मदराची रशियाला मोठी चिंता वाटत आहे. त्यामुळे आता पश्चिम रशियातील निजनी नोवगोरोड ओब्लास्ट प्रांतात रशियन नागरिकांना चार चार अपत्ये जन्माला घालण्याचे आवाहन केले जात आहे.
सरकार प्रत्येक मुलाच्या जन्मानंतर १० लाख रुबल म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास ८ लाख रुपये देणार आहे. निजनी नोवगोरोड ओब्लास्टचे गव्हर्नर ग्लेब निकितिन यांनी केलेली घोषणा एका रिपोर्टमध्ये प्रकाशित केली आहे. रशियात सध्या जन्मदर प्रति महिला १.५ इतका आहे. सध्याची लोकसंख्या कायम ठेवण्यासाठी हा जन्मदर २.१ इतका असण्याची गरज आहे. युक्रेनसोबत युद्धानंतर रशियात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे गेल्या तीन वर्षात रशियाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये तर गेल्या २५ वर्षांतील सर्वात निचांकी लोकसंख्या होती
.