डोंबिवली : कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या वाढत चालली आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून आताचे विद्यमान आमदार मनसेचे राजू पाटील आहेत. त्यामुळे राजू पाटील यांची मनसेकडून उमेदवारी निश्चित आहे. परंतु विरोधी पक्ष म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडूनही या कल्याण ग्रामीण मतदारसंघासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार सुभाष भोईर हे या निवडणुकीसाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यांनी आपली तयारी देखील सुरू केली आहे. मात्र, या पक्षातील दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करून आपली दावेदारी केली आहे. त्यामुळे उबाठा गटात सुभाष भोईर विरूद्ध रोहिदास मुंडे अशी स्पर्धा निर्माण झाली आहे. मुंडे यांनी सांगितले की, “मी देखील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. सुभाष भोईर माजी आमदार असले तरी पक्षामध्ये माझे नाव देखील विचारात घेतले जावे,” अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याची माहिती मुंडे यांनी यावेळी दिली. त्यामुळे उबाठा ठाकरे गटाकडून या मतदारसंघात उमेदवारीसाठी दावेदारांची स्पर्धा वाढू लागली आहे.