तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचा साडेतीन तासात भव्य नजराणा
मुंबई : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, समाजसेवक, पत्रकार अशा विविधांगी भूमिकांनी नटलेले व्यक्तिमत्त्व विजय वैद्य यांच्या जयंतीनिमित्त त्यांची कर्मभूमी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेच्या भव्य व्यासपीठावर ‘गाथा स्वराज्याची आणि गौरव विजय वैद्य यांच्या कार्यकर्तृत्वाचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वस्तरीय घटकांनी आवर्जून उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले.
ख्यातनाम लेखक आणि संगीत संयोजक रवि मल्ल्या यांनी नंदकुमार मोरे, वसंत सावंत, राजा खोपकर, राजू देसाई, हेमंत पाटकर, सुभाष देसाई, सचिन वगळ, विजय मडव, मागाठाणे मित्र मंडळ आणि उपनगरचा राजाचे सर्व पदाधिकारी, दादासाहेब शिंदे, वसंत तांबे, हंबीरराव यांची भूमिका साकार करणारे अभिनेते अनिल गवस, आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचे बंधू शिरीष वराडकर, अवयवदान चळवळीचे कार्यकर्ते प्रवीण वराडकर, मिलिंद कोळवणकर, रोहिणी चौगुले, आदींच्या उपस्थितीत सरस्वती देवी आणि विजय वैद्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केल्यानंतर वायंगणकर साई स्पोर्ट्सच्या बालगोपाळांनी सरस्वती वंदना सादर केली.
प्रा. सौ. नयना रेगे यांनी आपल्या खुमासदार शैलीत विजय वैद्य यांचा प्रदीर्घ जीवनपट उलगडून दाखविला. भक्ती सावंत यांनी तयार केलेली विजय वैद्य आणि राजू देसाई यांच्या निवडक छायाचित्रांची सुंदर अशी चित्रफीत सादर केली. संगीत संयोजक रवि मल्ल्या यांनी त्यांच्या वृंदा मल्ल्या, संगीता मिरकर, उमेश लाड, रश्मी मुळे, भूषण मुळे, राजन पट्टण, मंजिरी आजरेकर या कलाकारांच्या वाद्यवृंदासह सादर केलेली आठवणीतली गाणी, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त आणि रायगड या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीला पाचशे एक वेळा भेट देऊन घराघरात, मनामनात छत्रपती शिवाजी महाराज यांचा खराखुरा इतिहास पोहोचविणारे राजू देसाई यांचे खड्या आवाजातील स्वराज्याचा अपरिचित इतिहास सादर करुन तमाम उपस्थितांना एकाच जागी खिळवून ठेवले. उत्तर मुंबई पत्रकार संघ, मागाठाणे मित्र मंडळ, उपनगराचा राजा आणि साप्ताहिक आहुति आयोजित या कार्यक्रमात गेली ४२ वर्षे विजय वैद्य यांनी अखंड चालविलेल्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या भव्य आणि आकर्षक व्यासपीठावर कला महर्षी उदय पै यांच्या ॲड आर्टस् ने बनविलेला सप्तरंगी भव्य फलक सर्वांनाच भुरळ पाडत होता.
सुमारे तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचा साडेतीन तासात रसिकांना, हितचिंतकांना सादर करण्यात आलेला भरगच्च नजराणा म्हणजे एक मेजवानीच होती. याद्वारे विजय वैद्य यांचा वावर अद्यापही होत असल्याचे जाणवत होते. विनोद घोसाळकर, मंगलाताई खाडिलकर, विलास पोतनीस, रेखा बोऱ्हाडे, अभिनेते अनिल गवस, गुजराती अभिनेते गुजराती रंगभूमीवरील अभिनेत्री जिग्ना हितांशु वैद्य, भक्ती सावंत, रेवा राजेश देसाई, रोहिणी चौगुले, शुभदा शिंदे, अमित मोरे, दिनेश विचारे, अभिलाष कोंडविलकर, चंद्रकांत सावंत, संजय जोजन, नंदकुमार शिवलकर, विनय पाटील, मीना नाईक, समीक्षक निलीमा जांगडा, मार्मिकचे स्तंभलेखक योगेंद्र ठाकूर, वासुदेव नार्वेकर , सत्यवान ताठरे, प्रमोद तेंडुलकर, उन्मेष मळेकर, श्याम कदम, भरत घाणेकर, सुरेश परांजपे, विलास देशमुख, घर हक्क समितीच्या अध्यक्षा मोहिनी अणावकर, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य मिलिंद साटम, शाम साळवी, राकेश वायंगणकर, दिपक गोसावी, नरेश झगडे शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी, चित्रपट सृष्टीतील कलाकारांपासून तर रिक्षाचालक, घरेलू कामगार आदी समाजाच्या सर्वच स्तरातील लोकांनी उपस्थित राहून विजय वैद्य यांच्या प्रती आपली बांधिलकी दाखवून दिली. ह्रुदय हेलावून टाकणाऱ्या या कार्यक्रमाला वैशाली विजय वैद्य, वैभव विजय वैद्य आणि प्रतिमा वैभव वैद्य यांनी उपस्थित राहून कृतज्ञता व्यक्त केली.