अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे भाविकांकडून दिल्या जाणाऱ्या देणग्यांचा ओघही प्रचंड वाढला आहे. राम मंदिराला दररोज सुमारे ६० ते ७० हजार भाविक भेट देतात. शनिवार आणि रविवारी सुट्टी ही संख्या जवळपास दुपटीने वाढते. तर सणासुदीच्या दिवशी तिपटीहूनही जास्त असतात . एप्रिल ते ऑक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधी मंदिर ट्रस्टचा महसूल १८३ कोटी रुपये एवढा विक्रमी नोंदवला गेला आहे. या महसुलापैकी ७८ कोटी रुपये थेट देणग्यांच्या माध्यमातून तर १०५ कोटी रुपये बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवींच्या व्याजापोटी मंदिर ट्रस्टला मिळाले आहेत. या भाविकांकडून मंदिराच्या दानपेटीत दिले जाणारे दान दरमहा सरासरी १० कोटी रुपये इतके आहे. आरटीजीएस, चेक आणि ऑनलाईन ट्रान्स्फरच्या माध्यमातून वर्षाला सरासरी ११ कोटी रुपयांची देणगी ट्रस्टला प्राप्त होते. ट्रस्टला सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या स्वरुपात मिळणारी देणगी देखील काही कोटींच्या घरात आहे.