पुणे : महायुतीत आम्हाला जागावाटपात विचारात घेतले गेले नाही. शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा आम्ही मागितल्या होत्या. त्यावर कोणतीच चर्चा झाली नाही. आता आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अशा शब्दांत आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस, इंडिया आघाडीचे बारा वाजविण्यासाठी आम्ही भाजपसोबत आहोत, गेल्या बारा वर्षांपासून महायुतीत आम्ही आहोत, परंतु सन्मानाने वागणूक दिली जात नाही, अशी खंतही आठवले यांनी व्यक्त केली.
‘शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मागणी आम्ही केली होती. परंतु जागावाटपाच्या चर्चेत आम्हाला स्थान दिले जात नाही. आमच्या काही नेत्यांनी चर्चा केली आहे. परंतु महायुतीच्या जागावाटपात आमचे नाव येत नाही.नुसतीच नव्यांचीच नावे येत आहेत. आमच्यासारख्या जुन्या पक्षाची नावे येत नाहीत. महायुती आरपीआयच्या पाठिंब्यामुळेच झाली आहे. आरपीआयकडे लक्ष दिले जात नाही अशी भावना कार्यकर्त्यांची झाली आहे. सन्मान मिळाला पाहिजे, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे,’असे आठवले यांनी नमूद केले. तसेच मनसेला सोबत घेण्याची आवश्यकता नसल्याचेही आठवले म्हणाले.
मी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार आहे असे नमूद करीत आठवले म्हणाले, ‘केंद्रात एक मंत्रिपद मिळावे, राज्यातही एक मंत्रिपद मिळावे, दोन महामंडळे मिळावीत, एक विधान परिषदेची जागा मिळावी, विधानसभेच्या दहा ते पंधरा जागा मिळाव्यात अशा आमच्या मागण्या आहेत. आमचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढणार नाहीत. मी शिर्डीतून लढण्यास इच्छुक आहे.’ असेही आठवले यांनी सांगितले.
माझे फोटो छापले जात नाहीत
महायुतीच्या जाहिरातीमध्ये माझा फोटो छापला जात नाही, अशी तक्रार आठवले यांनी केली. अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे फोटो छापले जातात. ‘शासन आपल्या दारी’ या विषयात निळा झेंडा दिसत नाही. कायकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही, अशी तक्रार आठवले यांनी केली.