नागपूर : निवडणुकीत पराभवानंतरही आपले नाव प्रदेशाध्यक्ष आणि मंत्रीपदासाठी चर्चेत होते. शिंदे यांनी आज, बुधवारी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आता विधानपरिषद सभापतीपदाची संधी देऊन पक्षाने मोठा बहुमान केलाय. या संधीचे सोने करेन असे मत भाजप आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केला. सभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर शिंदे म्हणाले की, महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधान परिषदेचा सभापती म्हणून माझ्या नावाची शिफारस केली. परिषदेचा सभापती बिनविरोध निवडून यावा, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. विरोधकांनीही मान ठेवत माझ्या निवडीला पाठिंबा दिला. महायुती आणि विरोधकांचे आभार मानतो. राजकारणात चर्चा महत्त्वाची आहे, यावर शिंदे यांनी भर दिला.