मुंबई – मुंबईत स्वतःचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. याच स्वप्नाला मूर्त रूप देण्यासाठी म्हाडा वर्षानुवर्षे कार्यरत आहे. यंदा म्हाडाच्या लॉटरीमध्ये २०३० घरांसाठी अर्ज घेण्यात आले होते. त्यात एकूण १ लाख १३ हजार जणांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनाही म्हाडाच्या लॉटरीतून घर मिळालं आहे. त्यांनी खासदार कोट्यातून अर्ज केल्यामुळे त्यांचं घर लॉटरीपूर्वीच निश्चित झालं होतं.
मुंबईतील पवई भागात मिळालेलं हे घर शेट्टींच्या दृष्टिने विशेष आहे. शिवार ते पवई असा त्यांच्या घराच्या प्रवासाचा उल्लेख केला जात आहे. शेट्टींनी मध्यम श्रेणीतील घरासाठी अर्ज केला होता. त्याची किंमत सुमारे १ कोटी २० लाख १३ हजार रुपये आहे. खासदार कोट्यात तीन घरं उपलब्ध होती परंतु शेट्टी यांचाच अर्ज आल्याने त्यांना सहज मुंबईत घर मिळालं. या यशाबद्दल म्हाडाने लॉटरीच्या दिवस अधिकृतपणे त्यांच्या घराची घोषणा केली. त्यामुळे आता राजू शेट्टी मुंबईतील पवई भागात राहण्याची संधी साधणार आहेत. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी लॉटरीतून घर मिळालेल्यांचे अभिनंदन केलं आणि उर्वरित इच्छुकांसाठी आगामी लॉटरीचेआश्वासन दिले. म्हाडाच्या लॉटरीमध्ये मराठी कलाकारांनाही घर मिळालं आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे हिला गोरेगाव, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल बने याला कन्नमवार नगरमधील घर तर अभिनेता गौरव मोरे आणि शिव ठाकरे यांना पवईतील उच्च श्रेणीतील घरं मिळाली आहेत. हे एचआयजी घर सुमारे १ कोटी ७८ लाख रुपये किंमतीचं असून, त्यासाठी त्यांनी अर्ज केले होते. म्हाडाने १९७७ साली स्थापनेपासून सात लाखांहून अधिक घरं वाटप केलेली आहेत. त्यापैकी सुमारे अडीच लाख घरं मुंबईतच दिलेली आहेत. म्हाडाच्या उद्देशानुसार मुंबईतील सर्वसामान्यांना परवडतील अशी घरं उपलब्ध करून देण्यात येतात. जेणेकरून सर्वांनाच आपल्या स्वप्नाचं घर मिळू शकेल.