रत्नागिरी : आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नाव महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बँकांमध्ये घेतले जाते. खासदर तटकरे यांनी आपल्या मनोगतामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांना जास्तीत जास्त व चांगल्या प्रकारे कर्ज स्वरूपात आर्थिक मदत करावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. रायगडचे खासदार तथा पेट्रोलियम व नैसर्गिक वायु समितीचे अध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सदिच्छा भेट दिली. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, बँकेचे संचालक रामभाऊ गराटे, महेश खामकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण व बँकेचे सर्व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी तटकरे म्हणाले, रत्नागिरी जिल्हा बँकेचे काम कौतुकास्पद असून, त्याचे सर्व श्रेय बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची शिस्त व त्यास बँकेचे सर्व संचालक व कर्मचारी यांनी दिलेली साथ यांचे कौतुक आहे.
बँकेने संपूर्ण महाराष्ट्रात एक नावाजलेली जिल्हा बँक म्हणून नाव कमावले आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात, देशात सहकाराची पडझड होत असताना बँकेचा व्यवसाय टिकवून ठेवणे, ग्राहक टिकवून ठेवणे हे जोखमीचे असताना देखील या परिस्थितीवर मात करून रत्नागिरी जिल्हा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आधुनिक बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देऊन बँकेची प्रगती साधण्यावर लक्ष केंद्रीत केले. यात जिल्हा बँक पूर्णपणे यशस्वी झाली आहे.