पुणे : राहुल गांधी राजकारण करण्यासाठी परभणीला गेले होते. सातत्याने द्वेषच पसरवत रहायचा इतकेच त्यांना जमते. परभणीतही राहुल यांनी तेच केल्याचे सडेतोड प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. परभणीत जाऊन सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, दलित असल्यामुळे पोलिसांनी त्याची हत्या केली असून मुख्यमंत्री विधानसभेत खोटे बोलल्याचा आरोप राहुल यांनी केला. यासंदर्भात फडणवीस यांना विचारले असता त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी याठिकाणी केवळ राजकीय हेतूने आले होते. ही केवळ राजकीय भेट होती. लोकांमध्ये, जातीजातींमध्ये द्वेष तयार करायचा, एवढे एकमेव ध्येय त्यांचे आहे. तेच काम गेली अनेक वर्ष ते सातत्याने करताहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की, हे जे काही विद्वेषाचे त्यांचं जे काम आहे, त्याठिकाणी जाऊन पूर्ण केल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू म्हणजे हत्या आणि यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटे निवेदन केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुण्यात हे प्रत्युत्तर दिले आहे. परभणी प्रकरणी राज्य सरकार संवेदनशील असल्यामुळेच, याठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी घोषित केलेली आहे. न्यायालयीन चौकशीत यासंदर्भातील सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल. काहीही लपवण्याचे कारण नाहीये. आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारामध्ये मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय, असे बाहेर आले, तर कुणालाही सोडले जाणार नाही. कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई केली जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.