रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले करा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांचे निर्देश

0

मुंबई : पु. ल. देशपांडे अकादमीच्‍या नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन नाट्य, सिनेमा कलावंत आणि प्रेक्षकांना रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेर पर्यंत खुले करु देता येईल या दृष्‍टीने कामाचे नियोजन करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. महाराष्‍ट्र शासनाच्‍या पु. ल. देशपांडे अकादमीच्‍या नुतनीकरणाचे काम वेगाने सुरू असून आज या कामाची पाहणी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केली.

यावेळी अकादमीच्‍या संचालक मीनल जोगळेकर यांच्‍यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबधित अधिकारी उपस्थित होते. हे नुतनीकरण करत असताना कलावंत व प्रेक्षकांना अद्यावत सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असून रवींद्र नाट्य मंदिरात नाटक अथवा सिनेमा सुध्‍दा पाहता येणार आहे. त्‍यासाठी मोठी एलईडी स्क्रिन व सिनेमासाठी आवश्‍यक असणारा डॉल्‍बी साऊंड सिस्‍टीम सुध्‍दा उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. तर नाटकांसाठी लागणारी साउंड सिस्‍टीम सुध्‍दा अद्यावत करण्‍यात आली असून आसन व्‍यवस्‍था सुध्‍दा आरामदायी करण्‍यात आली आहे.

मिनी थि‍अटरमध्‍ये सुध्‍दा अशाच प्रकारे नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम यासह सिनेमासाठीही सर्व सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार असून नाटक, सांस्कृतिक, संगीत, साहित्यिक कार्यक्रमांसह मराठी सि‍नेमांसाठी ही दोन थिएटर उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत.कलावंताना जशा आवश्‍यक आहेत त्‍या पध्‍दतीने सुसज्‍ज असे मेकअप रुम व थिएटरच्‍या सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असून कलादालन व इतर दालने सुध्‍दा अत्‍यंत देखण्‍या स्‍वरुपात उभारली जात आहेत. शिवाय बाहेर छोटे खुले नाटयगृह सुध्‍दा तयार करुण्‍यात येत आहे.

या संपुर्ण वास्‍तुला मराठेशाहीचा साज चढवण्‍यात येणार असून आतील भागात मराठी कला संस्‍कृती व नाट्य पंरपरेचा विचार करुन सजावट करण्‍यात येणार आहे. आज मंत्री ॲड आशिष शेलार यांनी या संपुर्ण कामाची पाहणी करुन समाधान व्‍यक्‍त केले तसेच काही सूचनाही केल्‍या . सध्या सुरू असलेले काम जलदगतीने पुर्ण करत फेब्रुवारी अखेर पर्यंत संपुर्ण वास्‍तू आणि सर्व दालने खुली होतील या पध्‍दतीने कामाचे नियोजन करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech