पुणे : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग मोठया प्रमाणावर उडविले जातात. यात लहान-मोठे सर्वच सहभागी होत असतात. कुणाच्या आनंदात, कुणाचा बळी जाता कामा नये, म्हणून ठोस पावले उचलली जात आहेत. मांजाने गळा चिरणे, अशा प्रकारावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली असून, आता नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांसह या मांजाची विक्री करणारे मुख्य डीलर आणि उत्पादक यांच्यावरदेखील थेट कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील विविध भागांमध्ये नायलॉन मांजामुळे दुखापतीच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून दरवर्षी हा नायलॉन मांजा बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे आता यावेळी पोलिसांनी डीलरवरच कारवाईचे पाऊल उचचले आहे.
दरम्यान, शहरात नायलॉन मांजामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले, तर काहींना जीव गमवावा लागला आहे. याच नायलॉन मांजामुळे कोंढवा बुद्रुक परिसरात दोन महिला जखमी झाल्याची घटना घडली होती. यापूर्वीही या धारदार मांजामुळे अनेक नागरिक जखमी होण्यासह काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही शहरात या मांजाची विक्री होत असल्याचे पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून समोर आले आहे.दरवेळी कारवाईत केवळ मांजा विक्रेता लहान दुकानदार अडकतो. परंतु, नायलॉन मांजाचा डीलर आणि या मांजाचे उत्पादन करणारेदेखील याला कारणीभूत असल्याने त्यांच्यावर देखील केली जाणार आहे.