मुंबई – यंदाची लोकसभा निवडणूक ही सात टप्प्यांत होणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी एक दिवसाची भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली.
या मतदानासाठी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणुकीच्या दिवशी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत देणे बंधनकारक असणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या शासकीय परिपत्रकात म्हटले आहे की, लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम१३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदाराना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था / आस्थापना इत्यादी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्याच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.