नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या नि-क्षय अभियानाच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी क्षयरोग रुग्णांच्या समुपदेशनासह जनजगृतीही महत्वाची असल्याचे प्रतिपादन मंत्री गिरीष महाजन यांनी केले. नि – क्षय अभियानाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे देशभरातील सर्व मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी मंत्री महाजन बोलत होते. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, क्षयरोग व कुष्ठरोग सह संचालक डॉ. संदीप सांगळे यांच्यासह देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री दूरदृष्टप्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नड्डा म्हणाले की, देश 2025 सालापर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दीष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. या अभियानाचा आठवड्यातून किमान एकदा प्रत्येक राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना या अभियानाच्या जनजागृतीसाठी सहभागी करून घ्यावे. अशासकीय संस्था, उद्योग, व्यावसायिक यांनाही सहभागी करावे. देशात क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये आणि क्षय रोगामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. ही चांगली बाब आहे. जागतिक स्तरावर विचार करता जगाच्या दुप्पट वेगाने सध्या आपण क्षयरोग निर्मूलन करत आहोत. अशाच पद्धतीने आपण सर्वांनी काम करुया आणि 2025 पर्यंत देश क्षयरोग मुक्त करुया, असेही नड्डा यांनी सांगितले.
यावेळी मंत्री महाजन म्हणाले की, राज्यात नि-क्षय अभियानाचे काम उत्कृष्ट पद्धतीने सुरू असून राज्यातील दीड कोटी नागरिकांची या अभियानात तपासणी करण्यात येणार आहे. अभियानाची सुरुवात झाल्यापासून मागील 15 दिवसात राज्यात 15 लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली असून सुमारे 4 हजार रुग्ण सापडले आहेत. राज्यात 17 ग्रामीण जिल्ह्यात आणि 13 महानगरपालिका क्षेत्रात हे अभियान राबवण्यात येत आहे. राज्यात 360 नॅट मशिन्स असून 103 सीबीनॅट मशिन्स आहेत. 14 एक्स रे मशिन्स उपलब्ध असून येत्या 10 दिवसात 53 एक्सरे मशिन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 362 शासकीय स्टॅटिक एक्स रे मशिन्स असून खाजगी क्षेत्रातील 343 स्टॅटिक एक्स रे मशिन्स उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. खाजगी क्षेत्राचाही सहभागही घेण्यात येत आहे.