मुंबई : नवी मुंबई शहरातील इस्कॉन मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून खारघरमधील श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचा उद्घाटन सोहळा ९ ते १५ जानेवारीदरम्यान होणार आहे. या मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शनिवारी आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. इस्कॉन मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून उद्घाटन सोहळापूर्व कार्यक्रमात कलश स्थापना, कीर्तन-प्रवचन, भजनसंध्या, अभिषेक होणार आहे. त्यात ११ जानेवारीला अनुप जलोटा यांचे भजन, १२ जानेवारीला शुभधा वराडकर यांचे नृत्य, गीता राबरी यांचे विशेष गायन आणि लोकनाथ स्वामींचे प्रवचन होणार आहे. १३ जानेवारीला सायंकाळी अभिनेत्री हेमा मालिनी यांचे श्रीकृष्ण जीवनावर आधारित नृत्य आहे, १४ जानेवारीला अनुराधा पौडवाल यांचा गीतगायन कार्यक्रम तर १५ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
इंटर नॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सियसन्स (इस्कॉन) ही एक जागतिक संस्था आहे. भारतासह जगभरात सुमारे ४००० हून अधिक मंदिरे आहेत. इस्कॉनमधील अनुयायी जगभर भगवद्गीता आणि हिंदू धर्म, संस्कृतीचा प्रचार करतात. २०१२ साली खारघरमध्ये सेंट्रल पार्कशेजारी १ एकर जमिनीवर इस्कॉन मंदिराची स्थापना केली. मंदिर परिसरात दोन सहा मजली इमारतीचे बांधकाम अंतिम जवळपास पूर्ण झाले आहे. १६० कोटी रुपयांचा खर्च मंदिर उभारणीस आलेला आहे. एका इमारतीत राधा मदन मोहन, राम, सीता आणि लक्ष्मण आणि हनुमानाची भव्य आणि सुंदर मूर्ती तर एका मजल्यावर प्रभुपाद यांची मूर्ती असणार आहे. तसेच भक्त आणि मंदिर सदस्यांसाठी १०० खोल्यांचे गेस्ट हाऊस आहे. प्रसाद हॉलशिवाय श्रीकृष्णाचे सेवा करणाऱ्या ब्रह्मचारी आश्रम, वानप्रस्थाश्रम, प्रभूपाठ, महिलांसाठी वेगळे आश्रम उभारले आहेत. या सोहळ्यात वैदिक महाविद्यालय, भक्तीवेदान्त वाचनालय, वैद्यकीय सेवालय, गोशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आश्रम, वैदिक वस्तुसंग्रहालय, कल्चरल सेंटर आदींचे उद्घाटन तर आठ आचार्य आणि १० प्रमुख देवतांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तसेच वैदिक म्युझियम आणि कल्चरल सेंटरचे भूमिपूजन होणार असल्याचे खारघर इस्कॉन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष एच. जी. सूरदास यांनी सांगितले आहे.