अकोला जिल्हयातील पोषण आहाराच्या मसाला पाकीटात मिळाली मृत पाल…
मुंबई – मंगेश तरोळे पाटील
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना शाळेत गेल्यानंतर कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागाशिवाय दुसरं तिसरं कोणी सांगू शकत नाही? एवढं मात्र, खरं…! वारंवार होणाऱ्या घटनाकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत आल्याने शालेय शिक्षण विभाग नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. हे राज्यातील पालकांचे दुर्देवच…! एखादी घटना घडली आणि जनाआक्रोश रस्त्यावर उतरल्यानंतर, न्यायालयाने सरकारचे कान पकडल्यावरच शिक्षण विभाग व राज्य सरकारला जाग यावी एवढे दुर्देव का? पालकांना आपल मुलं शाळेत गेल्यावर त्याचे भविष्य सुरक्षित आहे का याची शाश्वती कमीच. राज्यात दररोज नवनवीन शालेय घटना समोर येत असतांना शालेय प्रशासन फक्त आश्वासनाचे गांजर दाखवून पालकांना शांत करण्याचे चित्र राज्यात वारंवार स्पष्ट होत आहे. मग ते लैगिंक अत्याचार असोत अथवा शालेय पोषण आहार असोत, पोषण आहारात अळ्या, उंदीर, झुरळ, साप, बेंडूक, अर्धमेलेला साप, मृत साप, मृत पाल हया घटना विद्यार्थ्यांसाठी व शाळा प्रशासनासाठी नवीन नाहीत. मग ते नांदेड जिल्हयातील हदगाव येथील प्राथमिक शाळेतील खिचडी पोषण आहारात मिळालेला अर्धवट जिंवत साप असोत किंवा सांगली जिल्हयातील सांगली जिल्ह्यातील पळूस तालुक्यात पोषण आहारात मिळालेला मृत साप असोत अथवा मृत उंदीर असोत किंवा उंदीराची विष्टा असोत, अळया असोत अशा घटनांना सरकारने कागदावरच ठेवल्याने, वेळेवर गांभीर्य लक्षात न घेतल्याने पोषण आहार पुरवणाऱ्या पुरवठादारांनी निकृष्ट दर्जांचा माल विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अकोला जिल्हा तेल्हारा तालुक्यातील तळेगाव डवला गावात ही घटना समोर आली आहे. शिक्षण विभागाने आता तरी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून यावर कठोर कारवाई करावी असा सूर पालकांचा आहे.राज्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पोषण आहार योजनेअंतर्गत पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, विद्यार्थ्यांचे आरोग्य सशक्त राहण्यासाठी शासन स्तरावर महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेत पोषण आहाराचे वाटप केले जाते. मात्र हाच पोषण आहार आता चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? असा प्रश्न आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामागील कारण म्हणजे पुन्हा एकदा पोषण आहारात मृत पाल निघाल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तळेगाव डवला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडला. शाळेत पोषण आहार तयार करण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यात चक्क पाल आढळून आली आहे. ही बाब पोषण आहार तयार करीत असताना लक्षात आली. सुदैवाने पोषण आहार तयार करण्यापूर्वीच हा प्रकार घडला. आहार तयार करणाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तेल्हारा गटशिक्षण अधिकाऱ्यांनी मसाल्याचं हे पॅकेट सिल केलं आहे. सील केलेले मसाल्याचे पाकीट पुढील तपासणी साठी अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवण्यात आलं आहे. मात्र या मसाल्याच्या पॅकेट मध्ये पाल निघाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वीही पोषण आहारात मृत पाल, उंदीर, झुरळ, अळ्या इत्यादी आढळल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. मात्र तरीही हे प्रकार थांबता थांबेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालू असल्याचा हे प्रकार कधी थांबतील असा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेने विचारला जात आहे.