युपीएससीकडून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द

0

* सर्व निवड प्रक्रियांतून केले कायमचे बाद

* नियमांचे उल्लंघन केल्यासंदर्भात दोषी असल्याचे निष्कर्ष

मुंबई – प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिने नियमांचे उल्लंघन केल्यासंदर्भात दोषी असल्याचा निष्कर्ष केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) काढला आहे. त्यानुसार युपीएससीकडून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द करण्यात आली असून भविष्यातील सर्व परीक्षा/निवड प्रक्रियांतून तिला कायमचे बाद केले आहे.

बनावट ओळखीसह परीक्षेच्या नियमात मंजूर असलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेळा परीक्षा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) नागरी सेवा परीक्षा-2022 (सीएसई- 2022)मध्ये तात्पुरत्या स्वरुपात शिफारस केलेल्या पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिला 18 जुलै 2024 रोजी कारणे दाखवा नोटीस(एससीएन)बजावली आहे. या नोटीसीला उत्तर देण्यासाठी तिला 25 जुलै 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, तिने आयोगाला 04 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत वाढवून देण्याची विनंती केली, जेणेकरून तिला तिच्या प्रतिसादासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवणे शक्य व्हावे.

पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिने केलेल्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तसेच या प्रकरणात पूर्ण न्याय व्हावा या उद्देशाने युपीएससीने नोटीसीवरील उत्तर सादर करणे शक्य व्हावे म्हणून तिला 30 जुलै 2024 रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची मुदत वाढवून दिली. याप्रसंगी, पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिला असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते की ही तिच्यासाठी एकमेव आणि शेवटची संधी असून यापुढे तिला मुदत वाढवून दिली जाणार नाही. तिला हे देखील निसंदिग्धपणे कळवण्यात आले होते की विहित दिवशी/वेळी तिच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही तर त्यानंतर तिच्याकडून आलेल्या कोणत्याही संदर्भाचा विचार न करता युपीएससी पुढील कारवाई सुरु करेल. पूजा हिला मुदतवाढ मंजूर करून देखील निर्धारित वेळेत तिच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण सादर करण्यात आले नाही.

युपीएससीने सर्व उपलब्ध नोंदींची तपासणी केली असून सदर प्रकरणी सीएसई-2022च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबाबत पूजा दोषी असल्याचे आढळून आले. तिची सीएसई-2022 साठीची तात्पुरती (प्रोव्हिजनल) उमेदवारी रद्द करण्यात आली असून युपीएससीतर्फे भविष्यात घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा/निवड प्रक्रियांतून देखील तिला कायमचे बाद ठरवण्यात आले आहे.

पूजा मनोरमा दिलीप खेडकर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, युपीएससीने वर्ष 2009 ते 2023 या 15 वर्षांच्या काळात सीएसई परीक्षेच्या अंतिम उमेदवारीसाठी पात्र ठरलेल्या सर्व म्हणजे सुमारे 15,000 हून अधिक उमेदवारांच्या उपलब्ध माहितीची बारकाईने छाननी केली असून या उमेदवारांनी सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती वेळा प्रयत्न केला होता यासंदर्भात तपासणी केली आहे. या तपशीलवार तपासणीअंती पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिची उमेदवारी वगळता अन्य कोणत्याही उमेदवाराने सीएसई नियमांनुसार परवानगी देण्यात आलेल्या प्रयत्नांच्या संख्येपेक्षा अधिक प्रयत्नांचा लाभ घेतल्याचे आढळून आले नाही. पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिच्या एकटीच्याच बाबतीत युपीएससीची प्रमाणित परिचालन पद्धत (एसओपी) तिने केलेल्या प्रयत्नांच्या संख्येची नोंद घेऊ शकली नाही. मुख्यतः पूजा हिने या प्रकरणी केवळ स्वतःचेच नव्हे तर पालकांचे देखील नाव बदलले असल्याने असे घडले आहे. अशा प्रकारच्या घटनांना भविष्यात आळा घालता यावा याची सुनिश्चिती करण्यासाठी युपीएससी स्वतःच्या एसओपीमध्ये आणखी कठोर करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे.

खोटी प्रमाणपत्रे (विशेषतः इतर मागासवर्गीय आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती या श्रेणींच्या बाबतीत) सादर करण्यासंदर्भातील तक्रारींचा विचार करुन, युपीएससीने स्पष्ट केले आहे की विविध परीक्षांसाठी सादर करण्यात आलेल्या अशा प्रमाणपत्रांची युपीएससीतर्फे केवळ प्राथमिक स्वरुपाची छाननी केली जाते. म्हणजेच प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने जारी केले आहे किंवा कसे, ते प्रमाणपत्र कोणत्या वर्षाशी संबंधित आहे, प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख, प्रमाणपत्रावर काही खाडाखोड अथवा गिरवून लिहिलेले आहे का तसेच प्रमाणपत्राचे एकंदर प्रारुप अशा बाबी तपासल्या जातात. सामान्यपणे, सादर केलेले प्रमाणपत्र जर सक्षम अधिकाऱ्याने जारी केले असेल तर ते अस्सल आहे असे मानण्यात येते. दर वर्षी युपीएससीकडे सादर करण्यात येणाऱ्या हजारो प्रमाणपत्रांची सत्यता तपासण्यासाठी आयोगाकडे कोणतीही नियमसंहिता अथवा साधन उपलब्ध नाही. अर्थात, प्रमाणपत्रांची छाननी आणि सत्यता पडताळणीचे काम संबंधित कार्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांने त्यांच्या कार्यालयीन अधिकारानुसार केले असे मानण्यात येते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech