नवी दिल्ली : पिलभित लोकसभा मतदारसंघातून भाजपने वरुण गांधी यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांनी भाजपत असताना अनेकदा मोदी सरकारच्या धोरणांवर टीकाही केली. त्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारल्याचे बोललं जात आहे. पण आता काँग्रेसने वरुण गांधी यांना सोबत येण्याची ऑफर दिली आहे. पण वरुण गांधी काँग्रेसची ही ऑफर स्विकारतील का, असा प्रश्न विचारला जात आहे.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे सुपुत्र संजय गांधी आणि त्यांच्या पत्नी मनेका गांधी यांचे वरुण गांधी हे सुपुत्र आहेत. गांधी घराण्यासाठी आणि काँग्रेसशी त्यांचा घनिष्ट संबंध आहे. पण काळाच्या ओघात संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे कुटुंब काँग्रेसपासून दुरावले. त्यानंतर मनेका गांधी यांनी पुत्र वरुण गांधी यांच्यासह भाजपत प्रवेश केला. त्यानंतर दोघेही भाजपचे खासदार राहिले. पण यंदा वरुण गांधींना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांनी वरुण गांधींनी जर काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आम्हाला आनंदच होईल, ते बडे नेते आहेत. तसेच उच्चशिक्षित राजकारणी आहेत, असे म्हटले.