अल्पकालावधीचे अधिवेशनामुळे जनतेचा अपेक्षाभंग – नाना पटोले

0

नागपूर : नागपूर अधिवेशनात विदर्भातील समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे परंतु सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन ठेवल्याने विदर्भातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या विदर्भात होत आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतमालाची खरेदी केंद्रे सुरु नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, या सर्व महत्वाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर सरकारला अधिवेशनात जाब विचारला जाईल सरकारने मात्र पळ काढू नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, विदर्भाच्या भूमित अधिवेशन होत असून एवढ्या अल्पकालावधीचे अधिवेशन पहिल्यांदाच होत आहे. अधिवेशन किमान तीन आठवड्यांचे असायला हवे होते. विदर्भातील अनेक प्रश्न आहेत त्यावर अधिवेशनात चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. भाजपा युती सरकारच्या काळात महाराष्ट्र अधोगतीला गेला आहे, राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. शेतकरी आत्महत्या होत आहेत. भाजपा युतीने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, असेही वडेट्टीवार म्हणाले.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे अंबादास दानवे, सुनिल प्रभू, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. या बैठकीत सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्य़ाचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील विविध विभागात दोन लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत, ही पदे भरण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा. कंत्राटी पद्धतीने भरती करणार नाही असा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही. सरकार आजही कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करत आहे. कोणत्याही प्रकारे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करु नये. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करावी, असे पटोले म्हणाले.

राज्यात बनावट औषधे विकून लोकांच्या जीवाशी खेळले जात आहे. मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी आरक्षणावरून भाजपा युतीने राज्यात रान उठवले होते. आता ते पाशवी बहुमताने सत्तेत आले आहेत, सरकारने या आरक्षणप्रश्नावर भूमिका जाहीर करावी, असेही नाना पटोले म्हणाले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, या अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न नाहीत, प्रश्नोतरे नाहीत. केवळ ५ दिवसांचे अधिवेशन घेतले जात आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी जनतेच्या प्रश्नावर सरकार जाब विचारु. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, नोकरभरती, बीड जिल्ह्यातील सरपंचाची हत्या, परभणीतील पोलीस अत्याचार या प्रश्नी सरकारला प्रश्न विचारू, असेही दानवे म्हणाले.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष युतीने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आता सरकारने सरसकट ३ लाख रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा करावी. सोयाबीनला ७ हजार रुपये, कापसाला ९ हजार रुपये भाव द्यावा. हमी भावापेक्षा कमी भावाने शेतमालाची खरेदी झाली असल्यास भावातील फरक देण्याचे सरकारने जाहीर केले होते तो आता सरकारने द्यावा. लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्य़ाचे आश्वासन दिले होते आता ते तातडीने पूर्ण करावे. लाडकी बहिण योजनेतील ५० ते ६० टक्के लाभार्थी कमी करणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु निवडणुकीआधी ज्या बहिणांना १५०० रुपये दिले त्या सर्व बहिणांना कोणतेही नियम, अटी, शर्ती न लावता पैसे द्यावेत.

परभणी व बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. परभणीत संविधानाची विटंबना करण्यात आल्यानंतर झालेल्या घटनेत पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. बीडमध्ये एका सरपंचाची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणी वाल्मिकी कराड या व्यक्तीचे नाव चर्चेत आहे, त्याचा मुख्यमंत्री फडणवीसांबरोबर फोटोही आहे, तो भाजपाचा कार्यकर्ता आहे का हे स्पष्ट करावे. बीड जिल्ह्यात मागील दोन वर्षात ३२ हत्या झालेल्या आहेत. या सर्व हत्यांची चौकशी उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायमूर्तीमार्फत केली जावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech