मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मी सन्मान करतो. त्यांना दीर्घ राजकीय अनुभव आहे, परंतु त्यांनी या वयामध्ये अशा प्रकारचा खोटारडेपणा करणे, जनतेला कन्फ्युज करणे अयोग्य आहे. राज्यात झालेला त्यांनी पराभव स्वीकारलं पाहिजे, असे सांगून बावनकुळे म्हणाले, जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा जनतेला कन्फ्युज करण्यासाठी व आपलं अपयश लपवण्याचं काम ते करत असून, जनतेने तर विधानसभामध्ये दाखवून दिले म्हणून ईव्हीएम मशीनवर दोष देऊन पुन्हा आपलं अपयश लपवण्याचे पाप पवार करत आहेत. एक प्रकारे ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान आहे, अशी परखड टिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
विधान भवन परिसरात बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले, विधानसभेमधील त्यांचा अत्यंत मोठा पराभव झाला आहे.जनतेने त्यांना नाकारले म्हणून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभवाची भीती असल्यामुळे आपले जनमत वाचवण्याकरिता शरद पवार पुन्हा प्रयत्न करत आहेत आणि मारकडवाडीमध्ये आलेली जी लोक आहेत ती पवार यांची कार्यकर्तेमंडळी आहेत. मारकडवाडीतील जनता त्यात कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीचे जे जे लोक ईव्हीएम मशीनवर निवडून आले आहेत त्या सर्वांनी राजीनामा दिले पाहिजे.खोटारडेपणा करण्यासाठी असा उद्योग सुरू केला आहे . लोकसभेला आम्हाला मोठ्या प्रमाणात अपयश मिळालेलं तर आम्ही ईव्हीएमला दोष दिले नाही तर आम्ही आमच्या चुका दुरुस्त केल्या.लोकसभेच्या पराभवातून आम्ही शिकलो आणि त्यातून आम्ही पुढे गेलो; त्यामुळे पवारांनीही पराभवातून शिकले पाहिजे, असे माझेच नाही तर महाराष्ट्रातील जनतेलाही वाटते.