पवार-ठाकरे मराठवाड्यात दंगली घडवण्याच्या प्रयत्नात : राज ठाकरे

0

जालना – राज ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार आणि ठाकरे मराठवाड्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाकरे यांनी हे आरोप जालन्यातील पत्रकार परिषदेत केले.

राज ठाकरे म्हणाले, “पुढील तीन ते साडेतीन महिन्यात मराठवाड्यात दंगली घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, आणि यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्रिय आहेत. शरद पवारांचे राजकारण जेम्स लेनप्रकरणापासून सुरू झाले आहे आणि त्यांच्या राजकारणाचा मूळ हेतू जातीय द्वेष पसरवणे आहे. महाराष्ट्रातील विविध जातींमध्ये फूट पाडून राजकीय लाभ मिळवण्याची त्यांची योजना आहे.”

ठाकरे यांनी त्यांच्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही केला. “माझ्या दौऱ्यावर अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण जर माझं मोहोळ उठलं तर, निवडणुकीला यांना एकही सभा घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये,” असा इशारा ठाकरे यांनी दिला.

यावेळी राज ठाकरे यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा पवार-ठाकरेंचा प्रयत्न उघड केला. “यांना वाटतं आमचे एवढे खासदार आले आहेत, त्यामुळे आमचा राग फडणवीसांवर काढता येईल. पण यांचं राजकारण समाजात विष कालवण्यावर आधारित आहे,” असे ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी काही पत्रकारांवरही आरोप केले की, “काही पत्रकार या षडयंत्रात सामील आहेत. त्यांनी लोकांना भडकवण्याचे काम केले आहे. या पत्रकारांची नावे माझ्याकडे आहेत, आणि योग्य ठिकाणी जाऊन चौकशी होईल,” असा इशारा त्यांनी दिला.

ठाकरे यांनी मराठवाड्यातील काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरही प्रकाश टाकला, जिथे त्यांनी पेव्हर ब्लॉकचे काम, एमआयडीसीच्या जागा, आणि वाहन खरेदीसाठी झालेल्या आर्थिक व्यवहारांवर आरोप केले. “धाराशीवला काही लोक मला भेटायला आले होते, तेव्हा काही पत्रकारांनी त्यांना भडकवण्याचे काम केले,” असे ते म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech