आलापल्लीच्या जंगलातील पातानील ”गणपती बाप्पा”

0

गडचिरोली – किर्र जंगलाचा प्रदेश म्हणुन गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. मानसिक दबावाच्या वातावरणातही कर्मचाऱ्यांच्या व भक्तांच्या पाठीशी घनदाट आलापलीच्या सागवानाच्या जंगलातला पातानील गणेश बाप्पा उभा आहे. नवसाला पावणारा गणपती अशी सर्वदूर ख्याती आहे .आलापल्ली गावापासून काही अंतरावर छायेत व बांबूच्या रांजीतील या बाप्पाच्या मंदिर स्थापनेची कथाही ‘जरा हटकेच’ आहे.गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारदृष्ट्या अहेरी तालुका सर्वाधिक विकसित भाग आहे. या तालुक्यातील आलापल्ली या गावापासून ४ किमी अंतरावर कच्च्या रस्त्याने आत गेल्यावर पातानील गणेश मंदिर आहे.

अहेरी भागातील सागवान हे जगातील उत्तम दर्जाचे सागवान समजले जाते. १९८० च्या दशकात हे सागवान लाकूड व्यावसायिक पद्धतीने तोडणी व विक्री करण्यासाठी मुलभूत वाहक म्हणून हत्तींचा वापर केला जात होता. १९८१ साली या भागात वन विभागाच्या अखत्यारीत ४ हत्ती होते. कापलेले सागवान जंगलाबाहेर आणण्याच्या रोजच्या कामावर हत्ती नेमले असताना यातील एक हत्ती जंगलात बेपत्ता झाला. २ दिवस उलटूनही या किर्र जंगलात त्याचा काही पत्ता लागेना. शेवटी वन विभागाच्या शोध मोहिमेतील कर्मचारी व मजुरांनी बाप्पाच्या चरणी साकडे घातले. ” हत्ती सापडू दे ,११ पोती नारळ फोडू ” आणि काय आश्चर्य काही क्षणातच हरविलेल्या हत्तीची किंकाळी मजुरांच्या कानी आली.

मजुरांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा लक्षात आले की हत्तीच्या गळ्यातील साखळदंड एका दगडाला अडकले आहेत. ते काही केल्या निघेनात. शेवटी जोर लावून हा दगड बाहेर काढला गेला. बघतात तर काय चक्क या दगडाला श्री गणेशाचे रुपडे होते. या पद्धतीने वन विभागावरील संकट गणरायानेच दूर केले, म्हणून वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी व मजुरांनी एकत्र येत ही मूर्ती साफ करून तिची प्राणप्रतिष्ठा केली.

हा सर्व प्रकार एखाद्या चमत्कारापेक्षा काही कमी नव्हता. आता पातानीलचा गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध पावला आहे. मजुरांनी या मंदिराच्या शेजारी एक झाड लावले आहे. ते आता मोठे झाले आहे. त्याभोवती आता चबुतरा बांधला गेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी एक बोअरवेल खोदली आहे. डांबरी रस्त्यापासून दूर असल्याने वन विभागाने तात्पुरत्या स्वरूपात का होईना हा रस्ता विकसित केला आहे.

पावसाळ्यात ही वाट कुठल्याही दृष्टीने पोचण्यासारखी नाही. जंगली श्वापद व त्याहून अधिक म्हणजे नक्षली कारवाया यामुळे इच्छा असूनही हिवाळा व उन्हाळा असे दोनच ऋतू येथे येण्यासाठी योग्य आहेत. मंदिर वन विभागाच्या जागेवर असल्याने इतर विभाग या मंदिराच्या विकासासाठी निधी देऊ शकत नाहीत. मात्र ही सर्व विघ्ने दूर होत मुलभूत सोयी मिळाव्या अशी भाविकांची मागणी आहे.

About Author

Comments are closed.

Maintain by Designwell Infotech