वॉशिंग्टन – नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) केनेडी स्पेस सेंटरवरुन भारतीय वशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स या बोईंग स्टारलायनर स्पेसक्राफ्टमधून उड्डाण करणार होत्या, परंतु स्पेसक्राफ्ट उड्डाणाला काही मिनिटे शिल्लक असताना ही मोहीम रद्द करण्यात आली. बोईंग स्पेसक्राफ्टमध्ये आलेल्या बिघाडामुळे मोहीम तूर्तास थांबवून पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सुनीता विल्यम्स यांची अंतराळ मोहीम पुन्हा एकदा लांबणीवर गेली. याआधीदेखील या मोहिमेत अडथळा आल्यानंतर ही मोहीम शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आली होती.
सुनीता विल्यम्स या अंतराळवीर बुट्स विलमोरे यांच्यासोबत बोईंग स्टारलाइनरमधून अंतराळात जाणार होत्या. बोईंगच्या स्पेसक्राफ्टमधून अंतराळात जाण्याची त्यांची ही पहिली वेळ होती. त्यामुळे ही मोहीम जर यशस्वी झाली असती तर हा क्षण ऐतिहासिक ठरला असता. सुनीता विल्यम्स आणि बुट्स विलमोरे हे अनुभवी अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर एक आठवडा राहणार होते. या मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण आणि विश्लेषण नासाकडून करण्यात येणार होते. सुनीता विल्यम्स अंतराळात जाणार असल्याने या मोहिमेकडे भारतीयांचे लक्ष लागले होते. काही दिवसात ही मोहीम पुन्हा राबवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.