रत्नागिरी : राजापूर विधानसभा मतदारसंघात आज चार उमेदवारांचे पाच अर्ज सादर झाले असून दाखल झालेल्या अर्जांची संख्या तेरा झाली आहे. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज सोमवारी चार उमेदवारांकडून पाच अर्ज सादर झाले. त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचे दोन, मविआला थेट आव्हान देत निवडणूक रिंगणात उतरलेले जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष अविनाश लाड यांचा एक, तर अपक्ष म्हणून अमृत तांबडे आणि संदीप जाधव यांचा एक असे पाच अर्ज सादर झाले.
यापूर्वी मविआचे उमेदवार राजन साळवी यांनी दोन अर्ज भरलेले असून आज त्यांनी आणखी दोन अर्ज भरल्याने त्यांच्या अर्जांची संख्या चार झाली आहे. जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष अविनाश लाड यांनी मविआला थेट आव्हान देत सलग तीन वेळा प्रत्येक एकेक अर्ज भरल्याने त्यांच्या अर्जांची संख्या तीन झाली आहे. महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांचे तीन अर्ज सादर झाले आहेत. अपक्ष म्हणून अमृत तांबडे, संदीप जाधव आणि यशवंत हर्याण यांचे प्रत्येक एक अर्ज असे १३ अर्ज सहाव्या दिवसांपर्यंत भरण्यात आले आहेत. आता मंगळवारी अखेरच्या दिवशी आणखी कोणकोणते उमेदवार अर्ज भरतात, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.