चेन्नई : फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूत जनजीवन विस्कळीत झाले असून फेंगल चक्रीवादळ उत्तर तामिळनाडू आणि पुद्दुचेरीजवळील कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान आज म्हणजेच 30 नोव्हेंबरच्या संध्याकाळी ताशी 70-80 किमी वेगाने किनारपट्टी ओलांडेल. दरम्यान, तामिळनाडूच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे तामिळनाडूतील 9 जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ खराब हवामानामुळे शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तात्पुरते बंद ठेवण्यात आला होता. दुसरीकडे, इंडिगो एअरलाइन्सने चेन्नईला येणारी सर्व उड्डाणे वळवली आहेत. प्रशासनाने पुद्दुचेरी किनारपट्टीवर सुरक्षा वाढवली आहे. पुद्दुचेरीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कलैवनन यांनी परिसरातील समुद्रकिनारे आणि किनारी रस्त्यांना भेट दिली. तामिळनाडूमधील लोकांना चेन्नईतील मरीना बीच, पट्टीनापक्कम आणि एडवर्ड इलियट बीचसह समुद्रकिनाऱ्यांना न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फेंगल चक्रीवादळामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुद्दुचेरीतील पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत.
वादळामुळे किनारी भागात पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे वातावरणात बदल झाला आहे. चेन्नईत शुक्रवारी रात्रीपासून आज सकाळपर्यंत सतत मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आयएमडीच्या मते, चक्रीवादळ ‘फेंगल’ प्रथम दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर पश्चिम-वायव्य दिशेने सरकले आणि आज संध्याकाळपर्यंत उत्तर तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला ओलांडण्याची अपेक्षा आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चेन्नईत मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. न्यू वॉशरमनपेट, जेमिनी फ्लायओव्हर आणि माउंट रोड भागात घोट्यापर्यंत पाणी साचले आहे. पुद्दुचेरीतील किनारी भागात 300 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.