मुंबई – मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची तक्रार नाही, त्यामुळे अर्ज छाननी होण्याबाबत निर्णय झालेला नाही असे वक्तव्य अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार व माजी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. अदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी करण्याचा सरकारचा निर्णय झालेला नाही. कारण सर्व छाननी करुन लाभार्थ्यांची निवड केली आहे. राज्यातील २ कोटी ४० लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यांना या योजनेचा लाभ असाच सुरु राहणार आहे. माझ्याकडे महिला व बालविकास विभागाची मंत्रीपद असताना कोणीही तक्रार केली नाही. जर अर्ज संदर्भात तक्रार आली तर छाननी करण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. या मुद्द्यावर आमदार तटकरे यांनी स्प्ष्टीकरण दिले.
मविआ वर टीका करत त्या म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेबाबत चुकीच्या पद्धतीने बातमी दिली आहे. काही अफवा पसरवल्या जात आहेत. विरोधकांना नेहमीच ही योजना डोळ्यात खुपली आहे. ते संभ्रम पसरवत आहेत. महायुतीने आश्वासन दिल्याप्रमाणे पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांना २१०० रुपयांचा लाभ देऊ. मुख्यमंत्र्यांनीदेखील यासंदर्भात माहिती दिली होती. १५०० रुपये दिल्यावर राज्याची आर्थिक व्यवस्था बिघडेल अशी टीका केली जात होती. परंतु मविआच्या जाहीरनाम्यात महिलांना ३ हजार देण्याचे आश्वासन दिेले होते. त्यामुळे विरोधकांची टीका आमच्यालेखी महत्वाची नाही.