पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी उठल्यानंतर त्यांचे हात दुखत होते. यानंतर वेदना असहय्य नितीश कुमार यांना पाटण्यातील मेदांता रुग्णालयात नेण्यात आले.
मेदांता रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांच्यावर रुग्णालयातील ऑर्थोपेडिक विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे एक पथक त्यांची काळजी घेत आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार हे खूप व्यस्त होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान, निवडणुकीचा प्रचार महिनाभर चालला आणि त्यानंतर केंद्रात सरकार स्थापनेबाबत दिल्लीत बैठकांची मालिका सुरूच राहिली. आता जनता दल युनायटेडच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २९ जून रोजी होणार आहे.
या बैठकीत नितीश कुमार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या महत्त्वाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेत तात्काळ रूग्णालय गाठले आणि स्वत: उपचार घेत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, याआधीही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार आजारी पडले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि तब्येत बरी झाल्यानंतर तो राजकारणात सक्रिय दिसू लागले.
काल म्हणजेच शुक्रवारी नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली तीन महिन्यांनंतर राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सरकारी कर्मचा-यांचा बेरोजगार भत्ता, घर भत्ता अशा २५ महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.