मुंबई : लक्षवेधी नाव असलेल्या या चित्रपटाच्या टीजरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली असून हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पर्यावरण, पत्रकारिता, प्रेम, नातेसंबंध, राजकारण, गुन्हेगारी, पैसा, प्रशासन अशा मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटाचा धमाकेदार टीजर नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशित झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार आवर्जून उपस्थित होते. विदर्भ आणि ख़ानदेशात लोकपरंपरेत वाघ नाचविण्याची परंपरा प्रसिद्द आहे. याच पारंपरिक पद्धतीने या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित पाहुणे आणि कलाकारांचे स्वागत करण्यात आले.
विदर्भातील चंद्रपूरमधील न्यूज चॅनेलचा पत्रकार, पर्यावरणप्रेमी तरुणी यांच्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. त्याशिवाय पर्यावरणाचे प्रश्न, गुन्हेगारी, राजकारण असे मुद्देही या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं टीजरवरून दिसून येतं. आजवर अनेक चित्रपटांतून पर्यावरण, वृत्तवाहिन्या, राजकारण अशा विषयांशी संबंधित गोष्टी दाखवल्या गेल्या असल्या तरी या चित्रपटाची गोष्ट खूपच वेगळी असल्याचं टीजर पाहून जाणवतं. ‘जंगलातील एकेका वाघाचा एरिया ठरलेला असतो,’ या वाक्यापासून सुरुवात होणारा टीजर क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारा आहे. ‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट आता चित्रपटगृहात पाहण्यासाठी ७ फेब्रुवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांचं आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन, श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केलं आहे. विनायक जाधव यांनी छायांकन, सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत, रोहित प्रधान यांना ध्वनिआरेखन केलं आहे. दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी नेहमीच वेगळ्या कलाकृती करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या अनेक मराठी-हिंदी टीव्ही मालिका गाजल्या आहेत. मनोरंजक पद्धतीनं सामाजिक भाष्य करण्याची त्यांची एक अनोखी कला आहे. ‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेला आहे. अभिनेता उपेंद्र लिमये, अभिनेत्री छाया कदम यांच्यासह रिचा अग्निहोत्री, साईंकित कामत, पद्मनाभ बिंड, मंगल केंकरे, वंदना वाकनीस, सुदेश म्हशीलकर, रमेश चांदणे, सिद्धीरूपा करमरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.