मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉसच्या पाचव्या सीझनमधील सर्वात गाजलेलं नाव म्हणजे निक्की तांबोळी. निक्की तांबोळी, लवकरच बदनाम चित्रपटातील आयटम साँगमध्ये दिसणार आहे. हा सिनेमा फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. पंजाबी इंडस्ट्रीतील पदार्पणाबद्दल निक्की तांबोळी म्हणाली, “‘बदनाम’चा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हे एक गाणे आहे जे तुम्हाला थिरकायला भाग पाडेल आणि अशा अप्रतिम टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे. मला आशा आहे की माझ्या चाहत्यांना हे गाणे नक्की आवडेल जेवढे मला या गाण्यात काम करताना मज्जा आली.” सुनिधी चौहानने या गाण्याला स्वरसाज दिला आहे. बदनाम चित्रपट फेब्रुवारी २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. जय रंधावा, जास्मिन भसीन आणि मुकेश ऋषी अभिनीत हा एक रोमँटिक ड्रामा आहे. निक्की तांबोळीला बिग बॉस मराठी ५ मधून चांगलीच लोकप्रियता मिळाली. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून चाहत्यांना तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल अपडेट्स देत असते. अशातच आता निक्की पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
दरम्यान, निक्की तांबोळीच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली तर तिने मॉडेल म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. २०१९ मध्ये तिने तेलगू हॉरर कॉमेडी चित्रपट ‘चिकती गाडीलो चिथाकोतुडू’ द्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘कांचना 3’ या ॲक्शन हॉरर तामिळ सिनेमात दिव्याची भूमिका साकारली होती. तिचा तिसरा चित्रपट तेलुगुमधला ‘थिप्पारा मीसम’ होता. २०२० मध्ये तिने बिग बॉस १४ मधून निक्कीने टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं.२०२१ मध्ये, तिने स्टंट-आधारित रिॲलिटी शो ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 1’ मध्ये भाग घेतला होता. त्यानंतर ती भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी होस्ट केलेल्या द खतरा शो या गेम शोमध्ये दिसली होती.त्यांनतर तिने मराठी बिग बॉस ५ मध्ये भाग घेऊन प्रसिद्धी मिळवली.